About the Institution

14 Jun 2023 16:05:17

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९६ सालात ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. ‘स्त्री शिक्षण आणि राष्ट्रीय प्रगती परस्परपूरक आहेत’ हा महर्षी कर्व्यांचा विश्वास होता, म्हणूनच सुरुवातीपासून ‘शिक्षणातून महिला सक्षमीकरण’ हे उद्दिष्ट घेऊन संस्था काम करते आहे.

प्रारंभी महर्षी कर्वे यांनी बालविधवांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अनाथ बालिकाश्रम’ या नावाने संस्थेची सुरुवात केली. हा ‘अनाथ बालिकाश्रम’ दि. १४ जून १८९६ या दिवशी सुरू झाला. पुण्यापासून ४ किमी अंतरावरील हिंगणे गावातील छोट्या जमिनीच्या तुकड्यावर उभारलेली इवलीशी झोपडी हीच संस्थेची पहिली वास्तू होती. प्रारंभी या जागेत केवळ ४ मुलींनी प्रवेश घेऊन शिक्षण सुरू केले.

सध्या संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले असून त्याद्वारे ३२,००० हून अधिक मुलींना शिक्षणाचा लाभ होत आहे. १२५ वर्षांहून अधिक जुनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सध्या आपल्या ७२ शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाच्या कार्यात अग्रेसर आहे. ही एकके पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर आणि कामशेत या ठिकाणी केवळ मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.

Powered By Sangraha 9.0